सोहम् नटले मानवरूपे
श्रीमद् सद्गुरु पावसचे परमहंस स्वरुपानंद यांच्याविषयी केवळ अक्षर विलासच सर्वत्र चालू आहे असे नाही तर , भावजगतात व ज्ञानजगतात अनेक साधक , सिद्ध,त्यांचे भक्त सातत्यानं त्यांना आपल्या हृदयसिंहासनावर आरूढ करत असतात. सर्वसामान्य लोकांसारखे लौकिक, कौटुंबिक, सामजिक घटनाक्रम वाट्यास आले तरीही अलौकिकात सोहम् माध्यमातून केवळ स्थिर होणेच नव्हे तर, सद्गुरुपदस्थ होणे सहज साध्य आहे. पण, यासाठी हवा सतत अभ्यास, अनुसंधान! ज्यायोगे मनुष्याचा देवही होऊ शकतो.हे ज्यांनी आपल्या वैयक्तिक उदाहरणावरून सिध्द करून दाखवले त्यांच्या अध्यात्त्मिक जीवनाचे विशेष रहस्य काय?
हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना भावजगतात, ज्ञान जगतात तसेच अध्यात्त्मिक विविध भूमिकांवर ज्यायोगे विचार केला जातो, त्या विचारांचा मागोवा केवळ लौकिक बुद्धीने घेत जाऊन सद्गुरु स्वामी स्वरुपानंद जाणिवेच्या स्तरावर उतरतीलच असे नाही.म्हणूनच “अहं”चा धूप जाळून, सोहम् तेजाने त्यांची आरती करावी.त्यांनी साधलेले सामरस्य आपणास साधता यावे यासाठी एकांतात , लोकांत व लोकांतात एकांत कर्म नियोजनाप्रमाणे जसा वाट्यास येईल त्या प्रमाणे साधत रहाणे, हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. श्री स्वामी चिन्मय देहाचे नियोजन परमात्म्याने याचसाठी केले होते की, ज्यायोगे अनेक सामान्य, अतिसामान्य , पतित, असामान्य इतकेच नव्हे तर चराचर, विशेष चैतन्य स्पर्शाने पुनीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. मनुष्य देहालाच काय तर प्राणीमात्राला सुद्धा नेत्र असतात. पण, सद्गुरु कृपेने ज्ञानांजनाने पवित्र झालेले नेत्र , ज्या देहाला लाभतात तो देह अनेक देहांना उजळून टाकतो. आपल्या सद्गुरूंच्या विषयी स्वामी स्वरुपानंद यांनी सहज अवस्थेत असे म्हंटले आहे की,
सद्गुरु गणनाथ उदार समर्थ l
घाली नेत्रात ज्ञानांजन l
सद्गुरु स्वामींची ही रचना अनंत कोटी ब्रम्हांडाचा ध्यास करणारी आहे. लौकिकात औदार्य मर्यादित असते.त्यात काहीसे राहूनही जाते. कधी कधी त्याच्या वर्तुळातून अहंकार डोकावतो. उणे, अधिकपणाची झालर त्याच्या भोवती असते. पण, स्वामींचे गुरु आणि माझे परात्पर गुरु ” गणनाथ ” हे शब्दातीत, चिंतनातीत इतकेच नव्हे तर
भावजगत , ज्ञानजगतासहीत सर्व जगताच्या पलीकडचे आहेत. तिथे उणेपणाला हार खावी लागली आहे. अधिक, सर्वाधिक हे शब्दही तिथे थांबले आहेत. म्हणूनच स्वामी म्हणतात की, सद्गुरुंचे औदार्य समर्थ आहे.अनंत कोटी ब्रम्हांडाना जो अर्थ प्राप्त करून देतो, तोच समर्थ!
असे चोखडे सामर्थ्य ज्या सद्गुरूंच्या कृपेत आहे, त्यांचे स्वामींनी शब्दात केलेले वर्णन जगदाभास समजणाऱ्या स्वामींच्या भाव हृदयाची साक्ष देते. सर्व सामान्य साधक वर्गाला हे आपल्याला जमणार का ? असा प्रश्न पडतो. विश्वब्रम्हांडाचा उद्धार करणारे स्वामी अनेक आर्त भक्तांच्या हाकेला धावून येतात. ते वेगळ्या योजनेतून ,
एकांती बसून करी सोहम् ध्यान l
तेणे तुझे मन स्थिरावेल l
या रचनेत केवळ आश्वासन नाही . तर, आशीर्वाद आहे. साधक भावह्रदय नखशिखांत अमृतात बुडवण्याचे सामर्थ्य आहे. आर्तांना आश्वासक, जिज्ञासूंना कर्मपथावर चालावयास लावणारी ही योजना , जणू अवकाशात
सधर्म, सत्कर्म बीजारोपणच करते यात शंका नाही.
केवळ पावस परिसरातील व्यक्तीलाच नव्हे तर ज्याला स्वामींची आठवण येते त्या प्रत्येकाला स्वामी आपले वाटतात . मातृपितृतुल्य हे शब्दं तिथं निर्बल होतात आणि स्वामी मातापिताच वाटतात. तुलनेला तिथं स्थान नाही. या स्वामींच्या आत्मवैभवाची जाणीव जर कोणते शब्दं देत असतील तर ते,
अलौकिक नोव्हावे लोकांप्रती l
हेच होय. सर्व वेदांचे सार ज्यांनी आपल्या मृदू मधुर वाणीने आपल्या वाङ्मयात ग्रथित करून , लोककल्याणासाठी व जीवमात्रांवर कृपा करण्यासाठीं अमृत अक्षरांचे महाकलश मंगलमय स्वरूपात निर्माण केले , ते माझे सद्गुरु सर्व अवस्थांच्या पलीकडचे होते यात संशय नाही. ज्यांच्या चरणाशी अवस्थात्रय विलय पावतात. नम्रतेने ‘ नकळे नेति
नेति ‘ असा उल्लेख , उद्गघोष करतात ते माझे सद्गुरु श्री क्षेत्र पावस येथे एका लहान खोलीत राहून, आपल्या पोटात विश्व ब्रम्हांडाचा ग्रास करून लीलया पृथ्वीवर चैतन्याची पखरण करीत होते. धावऱ्या जीवांना सावरणे, संकट ग्रस्तांना मदत करणे, योग विद्येचा पावन करणे, विरागाला समजावणे, तत्वज्ञानाला तत्व जाणवून देणे व संतांच्या ठिकाणचा अभिजात प्रेमयोग आपल्या हृदयात प्रस्थापित करून , प्राणिमात्राला ‘स्व ‘ भाव म्हणजे काय हे समजावणे व ते ही आपल्या सहज ‘ सोहम् ‘ भावात रमत ,रमत ! हे स्वामींचे विशेष पाहिल्यावर कोट्यावधी मस्तके, त्यांच्या चरणी लीन होतात. अनादी आणि अनंत असलेल्या श्री स्वामींचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न होत असताना प्रत्येक साधकाला स्वामी म्हणजे निर्विकल्पपणे भास सम्राट म्हणूनच ज्ञात आहेत.आपल्या’ सोहम् ‘ आणि ‘ओम
रामकृष्ण हरी ‘ या माध्यमातून ज्यांनी केवळ पृथ्वीचं नव्हे तर सर्व जगते काबीज केली व जे जगावेगळे झाले ते स्वामी स्वरुपानंद म्हणजे ‘ विश्वातील गुरुतत्वाचे अधिष्ठानच होय .’
अवतार होतात ते कार्य करण्याकरता, कधी ते जाणवतात तर कधी जाणवतही नाहीत.’ योग बलाने ‘ अवघे हरीमय आहे असे सांगणारे सद्गुरु स्वामी
नाथपंथाचा मूलमंत्र लोकमंगल कार्यासाठी सहज प्रकट करतात.त्यांचे तेजस्वी जीवन सर्वच झालरी सहज सुशोभित करते.मग तिथे ज्ञान असो, विज्ञान असो , भक्तीयोग, कर्मयोग , वेद वेदांत असो अथवा आत्म साक्षात्कार तत्वज्ञान असो ! जेथे स्वामी माध्यमातून विलसणारे गुरुतत्व नाही . तेथे काहीच नाही. श्री क्षेत्र नृसिंहवाडी, गिरनार, पिठापूर, गाणगापूर, कुरवपूर, औदुंबर विश्वातील सर्व संप्रदाय ज्यांनी सर्वगत गुरुतत्वाचा पुरस्कार केला , तेच गुरुतत्व माझ्या सद्गुरूंच्या पार्थिवातून विलसत होते.देहात नसतानाही तितक्याच सुशोभितपणे विलसत आहे.
अनादी अनंत स्वामी l
सदैव जाणवो अंतर्यामी l
अशी प्रार्थना त्यांच्या चरणी केल्यास व्यर्थ जाणार नाही हेच खरे.आपली चैतन्यभूमिका सद्गुरूंनी ज्ञानांजन घातल्यावर सहज योगाधरे बजावत असताना सद्गुरु स्वामींनी जी वाङ्मयरचना केली त्या रचनेतील प्रत्येक अक्षर केवळ चैतन्यप्रदच नाही तर साधकाला निर्लेप करून त्याचे साक्षित्व सिद्ध करण्यास समर्थ आहे. आपल्या सद्गुरु विषयीचा आदर व्यक्त करताना श्रीस्वामी सौम्यही आहेत व विराटही आहेत. सौम्य अशाचसाठी आहेत की, आपल्या सद्गुरुंच्या विषयी हलकेच निजगुज सांगत असताना ते म्हणतात की, गणनाथ हे उदारही आहेत व समर्थही आहेत. नाथपंथाचे आदिबीज ‘ ज्ञानांजन ‘ या शब्दाने प्रगट करून जीवभावांला तिलांजली देऊन असे सुचवले आहे की, हे अंजन साधकाला चराचरागत असलेल्या चैतन्याची ठोस प्रचिती देणारे आहे. श्री स्वामींचे अभंग घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, स्फुटलेखन घ्या, सोहम् विषयीचा बोध घ्या त्यांच्या, वाङ्मयरचनेतून जाणवत असलेला अकर्तात्म योग, ठोस भगवद् प्रचिती, निरहंकारित्व, स्वरूपलीनता, सदगुरुंच्या विषयीचा कृतज्ञता भाव, भगवती कुंडलिनी विषयक त्यांची प्रचिती व आपण अनादी, अनंत आहोत राम, कृष्ण,अक्कलकोट स्वामी मीच. सर्व काही मीच आहे!! हे जेंव्हा श्री स्वामी भक्तांच्या वाचनात येते तेंव्हा पावस मधे जणू त्रिलोक्याच्या स्वामींनीच काही दिवस श्री स्वरूपानंद नावाने मानवतनू धरून वास्तव्य केले होते असे केवळ वाटतं नाही तर प्रचितीला येते.
भाविक कधी स्वामींना ‘ श्रीस्वामी ‘ या नाम माध्यमातून स्पर्श करू इच्छितात तर, कधी त्यांना ध्यानात पाहू इच्छितात. पावसला जाणाऱ्या गाड्या, वाहनं जणू काही श्रीस्वामी यांच्या अमृतमय अक्षय गोडव्याला भुलून , अंगात वारं भरल्या प्रमाणे पावसला धावत सुटतात.
आम्हांस वाटे स्वरुपानंद l आहे अक्षय आनंदाचा कंद l
त्यांच्या स्वरूप योगापुढे मंद l सर्व बुद्धिजीवी होतात ll १ ll
गुरुची माझ्या पावस नगरी l देते अमृताच्या घागरी l
त्याची सेवा करता साजरी l आनंदी आनंद असे ll २ll
किती लिहू त्याच्यासाठी l जो घट्ट करीतसे ब्रम्हगाठी l
त्याच्या चरणाची भेटी l प्रत्येकाने घ्यावी हे वाटतसे ll ३ll
त्यांची खोली नव्हती साधी l तिला कधीच बाधली नाही उपाधी l
जणू सर्व जगातील व्याधी l निर्मूल करण्या स्वामी अवतार असे ll ४ll
आळंदीचे ज्ञानेश्वर l अक्कलकोट स्वामी धुरंधर l
पृथ्वीवरील सर्व गुरुअवतार l स्वामीच होते हे जाणा ll ५ll
शेवटी स्वामींनी दिल्या खुणा l प्रकट केला नाथपंथाचा बाणा l
नव्हतो मी कधीच उणा l हेच त्यांनी सांगितले ll ६ ll
प्रत्येकास वाटे माझा स्वामी l स्वामी सर्वांच्या अंतर्यामी l
स्वामीच व्यापून आहे व्योमी l हे सांगण्याची गरज नसे ll ७ll
कोणी म्हणती मज अधिकार l स्वामींनी दिधला फार l
स्वामी कृपा अपरंपार l माझ्यावरीच असे ll ८ll
असे म्हणू नये साधकाने l सोहम् साधन करा नेमाने l
थोडे तरी घ्या दमाने l मग परमार्थ सिद्धी दूर नसे ll ९ll
व्यर्थ बडबड करू नये l हेच कथिले स्वामीराये l
निजकृपेसाठी सोहम् उपाये l करीत रहा असे कथिले असे ll १०ll
धांदल गडबड करू नका l हाच असे गुरूचा हेका l
परमार्थ नाही फुका l मोल त्याला अपार असे ll ११ll
एकंदरीत श्री स्वामी जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने जे काही चालले आहे तो एक भावरम्य प्रवास असून प्रत्येक प्रवाशाने श्री स्वामींना अभिप्रेत असलेले सोहम् रत्न जीवाची बाजी लावून सांभाळावे असे वाटते.
सदगुरु गुरूनाथ मुंगळे